सांगोला नगरपरिषदेच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सदस्यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न

सांगोला/प्रतिनिधी
सांगोला नगरपरिषदेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहात नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. आनंदा माने व नवनिर्वाचित नगरपरिषद सदस्यांचा भव्य स्वागत समारंभ संपन्न झाला. या समारंभाचे अध्यक्षस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी भूषविले.
यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व सदस्यांचा शाल व रोपटे देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान नगरपरिषदेतील विविध विभागप्रमुखांनी आपल्या-आपल्या विभागांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
प्रसंगी बोलताना लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. आनंदा माने यांनी सांगोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे, तसेच अधिकारी व कर्मचार्यांनी नागरिकांची कामे जलद व पारदर्शक पद्धतीने मार्गी लावावीत, अशा स्पष्ट सूचना केल्या.
कार्यक्रमात नगरसेविका सौ. राणी माने, नगरसेवक श्री. रमेश जाधव व नगरसेवक श्री. ज्ञानेश्वर तेली यांनी आपले मनोगत व्यक्त करून शहर विकासाबाबत सकारात्मक भूमिका मांडली.
या स्वागत समारंभास नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी, तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम आनंदोत्सवाच्या वातावरणात पार पडला.