—
जागतिक मधुमेह दिनानिमित्त मोफत रक्तशर्करा तपासणी : 62 नागरिकांची तपासणी
डॉ.बोराडे हॉस्पिटल व सांगोला रोटरी क्लबचा उपक्रम…
सांगोला प्रतिनिधी
– जागतिक मधुमेह दिन व बालदिनानिमित्त डॉ. बोराडे हॉस्पिटल आणि सांगोला रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रक्तशर्करा तपासणी शिबिराचे आयोजन 14 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते.या वेळी उद्घाटन प्रसंगी प्रास्ताविक प्रा. राजेंद्र ठोंबरे यांनी केले. 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन असल्याने, नागरिकांना मधुमेहाच्या धोक्याची जाणीव करून देणे व आरोग्यविषयक जागरूकता वाढवणे, हा उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
शिबिरात तीन महिन्यांची सरासरी रक्तशर्करा पातळी दर्शवणारी HBA1C चाचणी तसेच जेवणापूर्वी व जेवणानंतरची दैनंदिन रक्तशर्करा तपासणी करण्यात आली. उपक्रमात आलेल्या प्रत्येक नागरिकाची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली पार पडली. रुग्णांना आवश्यक ते मार्गदर्शन, वैद्यकीय सल्ला, तसेच मधुमेह नियंत्रणासाठी आवश्यक आहार व जीवनशैलीविषयक सूचना देण्यात आल्या.
कार्यक्रमात रोटरी क्लब सांगोल्याचे अध्यक्ष श्रीपती आदलिंगे, माजी अध्यक्ष इंजी. मधुकर कांबळे, प्रा. साजिकराव पाटील, इंजी. विकास देशपांडे, इंजी. विलास बिले, डॉ. प्रमोद बोराडे व त्यांचा वैद्यकीय स्टाफ, धर्मराज बोराडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. रोटरी क्लब सांगोला अनेक वर्षांपासून हा सामाजिक आरोग्य उपक्रम सातत्याने राबवत आहे. मागील वर्षी तब्बल एक हजार नागरिकांची तपासणी करण्यात आल्याचे माहिती देताना माजी अध्यक्ष मधुकर कांबळे यांनी समाधान व्यक्त केले.
या वर्षीच्या शिबिरात रक्तातील साखर तपासणी – 62 नागरिक
आणि HBA1C चाचणी – 62 नागरिक,
अशी एकूण 62 नागरिकांच्या दोन चाचण्या मोफत करण्यात आल्या..
शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मधुमेह हा ‘मूकघातकी’ आजार असल्याने वेळेवर होत असलेली तपासणी आणि योग्य मार्गदर्शन अत्यंत गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले. रुग्णांना मोठ्या प्रमाणावर याचा लाभ झाला असून, अशा उपक्रमांचे सातत्य समाजाच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असे उपस्थितांनी सांगितले.