सांगोला नगरपरिषद निवडणूक 2025 : चौथ्या दिवशी 6 उमेदवारांचे 7 उमेदवारी अर्ज दाखल
सांगोला / प्रतिनिधी
सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, दि. 4 नोव्हेंबर 2025 पासून सांगोला नगरपरिषद कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी श्री. सुशांत खांडेकर, अपर जिल्हाधिकारी सांगली यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासनाने विविध पथके नेमली आहेत. नगरपरिषद क्षेत्रात 6 स्थिर सर्वेक्षण पथके, 1 भरारी पथक, 4 व्हिडिओ सर्वेक्षण पथके, तसेच 1 व्हिडिओ पाहणी पथक कार्यरत असून ही पथके वंदे मातरम चौक, पंढरपूर नाका, वाढेगाव नाका, कडलास नाका, वासूद चौक आणि मिरज रोडवरील पाण्याची टाकी परिसरात तैनात आहेत.
आचारसंहिता कक्षाची स्थापना देखील करण्यात आली असून, श्री. किरणकुमार काळे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. नागरिकांना आचारसंहितेबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्यांनी दूरध्वनी क्रमांक 7218343541 वर संपर्क साधावा, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सैफन नदाफ यांनी सांगितले की, सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. उल्लंघन करणार्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी (गुरुवार, दि. 13 नोव्हेंबर 2025) एकूण 6 उमेदवारांनी 7 उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सैफन नदाफ यांनी दिली आहे.
नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास दि. 10 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली असून, पहिल्या तीन दिवसांत एकही अर्ज दाखल झाला नव्हता. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत असून, अर्जांची छाननी 18 नोव्हेंबर रोजी केली जाणार आहे.
निवडणुकीत पारदर्शकता राखण्यासाठी आणि कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत म्हणून प्रशासनाकडून विविध पथके कार्यरत असून, मतदारांना वस्तू वा पैशाचे वाटप करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच, प्रचार फक्त अधिकृत प्रचार कालावधीतच करता येणार आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
राजकीय पक्षांकडून अद्याप अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल झाले नसल्याने, आज दाखल झालेले अर्ज व्यक्तिगत स्वरूपाचे असल्याचे नदाफ यांनी सांगितले.
गुरुवार, 13 नोव्हेंबर 2025 रोजी दाखल झालेले उमेदवार खालीलप्रमाणे –
प्रभाग क्र. 1 (ब) – सर्वसाधारण जागा : 1) मोहन गणपत बाबर 2) दीपक महादेव मदने
प्रभाग क्र. 2 (अ) – अनुसूचित जाती जागा : 1) दामोदर भिमराव साठे 2) पोपट रामचंद्र तोरणे
प्रभाग क्र. 4 (अ) – सर्वसाधारण महिला जागा : 1) आशादेवी सोमेश्वर यावलकर
प्रभाग क्र. 4 (ब) – सर्वसाधारण जागा : 1) सोमेश्वर रेवनसिद्ध यावलकर
प्रभाग क्र. 5 (अ) – मागास प्रवर्ग जागा : 1) दीपक बाळासाहेब मदने
निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सैफन नदाफ यांनी सर्व मतदार, उमेदवार आणि कार्यकर्त्यांना आवाहन केले की, सांगोला नगरपरिषद निवडणूक शांततेत, स्वच्छ आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.सांगोला नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असून, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि शिस्त राखण्यासाठी सर्व यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत.