सांगोला नगरपालिकेत झपके घराण्याचा परंपरेतून विकासाचा संकल्प — विश्वेश झपके उमेदवार..

सांगोला / प्रतिनिधी
सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापू लागले आहे. विविध पक्ष आणि स्वायत्त गटांकडून उमेदवारांच्या चर्चा जोरात सुरू आहेत. या सर्व चर्चांमध्ये सांगोला शहरातील जुनी सामाजिक, शैक्षणिक आणि सहकारी परंपरा असलेल्या झपके घराण्याचे नाव पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहे. या प्रतिष्ठेच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत तरुण, सुशिक्षित, अभियंता आणि उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेले मा. विश्वेश झपके हे उमेदवार म्हणून पुढे आले आहेत. त्यांच्या उमेदवारीची चर्चा शहरात आणि विद्यामंदिर परिवारात उत्साहाने सुरू असून, या उमेदवारीत झपके घराण्याच्या परंपरेचा, संस्कारांचा आणि सेवाभावाचा वारसा दिसून येतो.
अलीकडेच मा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी सांगोला विद्यामंदिर परिवाराशी विशेष संवाद साधला. या बैठकीत त्यांनी सांगोला नगरपालिकेतील झपके घराण्याचा दीर्घकालीन सहभाग, शैक्षणिक कार्य, सामाजिक योगदान आणि विश्वेश झपके यांच्या उमेदवारीमागील भूमिकेचा सविस्तर आढावा दिला. त्यांनी सांगितले की, “सांगोल्याचा विकास हा फक्त राजकारणाचा विषय नाही, तो एक सामाजिक जबाबदारीचा विषय आहे. झपके घराण्याने नेहमीच शिक्षण, सहकार आणि सामाजिक बांधिलकीला प्राधान्य दिले आहे. हाच वारसा विश्वेश झपके यांच्यामार्फत पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
झपके घराण्याचे सांगोला नगरपालिकेशी नाते हे तीन पिढ्यांपासूनचे आहे. विश्वेश झपके यांचे पणजोबा कै. आण्णासाहेब झपके हे सुमारे १९३५ च्या सुमारास सांगोला नगराध्यक्ष होते. त्या काळात सांगोला ही छोटी परंतु संस्कृतीने समृद्ध नगररचना होती. आण्णासाहेब झपके यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून पाण्याची सोय, स्वच्छता, आणि प्राथमिक शिक्षणाचा प्रसार यावर भर दिला. त्यांच्या या कार्याची नोंद सांगोला नगरपालिकेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेली आहे.
पुढे त्यांच्या आजी कै. शोभनतारा झपके या १९७२ च्या सुमारास शासन नियुक्त झालेल्या सांगोला नगरपालिकेच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा ठरल्या. त्या काळात सांगोला शहरात महिला नेतृत्वाची संकल्पना नवीन होती. परंतु शोभनताराबाईंनी आपल्या ठाम निर्णयक्षमतेने नगरसेवक आणि नागरिक यांचा विश्वास जिंकला. महिलांसाठी शौचालयांची निर्मिती, स्वच्छता मोहिमा, शाळांतील मुलींसाठी सुविधा आणि महिला बचतगटांची पायाभरणी हे त्यांचे कार्य विशेष ठरले.
वडिल प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी या परंपरेचा वारसा पुढे नेत १९९० च्या दशकात सांगोला नगराध्यक्ष म्हणून कार्य केले. नगरपरिषदेत त्यांनी विकासाला वेगळे परिमाण दिले. त्यांच्या काळात शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, वाचनालय आणि शैक्षणिक संस्थांच्या कामांना गती मिळाली. राजकारणात असूनही त्यांनी पक्षीय मर्यादा बाजूला ठेवून ‘विकास प्रथम’ ही भूमिका घेतली. त्यांचा हा विचार आजही अनेक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरतो.
आता या परंपरेचा वारसा पुढे नेत विश्वेश झपके उमेदवारीस आले आहेत. ते सुशिक्षित अभियंता असून सांगोला शहरातील पी.एन.जी. आणि सोलापुर येथील होंडा शोरूमच्या माध्यमातून उद्योगक्षेत्रात सक्रिय आहेत. तरुणाईत नवी विचारसरणी, आत्मविश्वास आणि तंत्रज्ञानाची जाण या गुणांनी सजलेले विश्वेश झपके हे उमेदवार शहराच्या विकासासाठी नव्या व्हिजनसह उभे आहेत.
प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यानी आदर्श नागरी सहकारी पतसंस्था या माध्यमातून सहकार क्षेत्रातही योगदान दिले आहे. सहकार म्हणजे लोकशाहीचा व्यवहारिक पाया आहे, या जाणिवेतून त्यांनी पतसंस्थेच्या कार्यात पारदर्शकता आणि नागरिकांचा विश्वास मिळवला. नगर वाचन मंदिर या संस्थेमार्फत त्यांनी वाचनसंस्कृतीला चालना दिली. शिक्षणावरील निष्ठा आणि सामाजिक कार्याची आवड हे झपके घराण्याचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच त्यांनी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आणि सांगोला विद्यामंदिर या संस्थांना आपला परिवार मानले आहे.
बैठकीत प्रबुद्धचंद्र झपके यांनी आपल्या भाषणात सांगितले, “विद्यामंदिर परिवाराने आम्हाला व आम्ही त्याला नेहमीच आपले मानले आहे. म्हणूनच या संस्थेतील प्रत्येक सदस्याशी आम्ही आत्मीयतेने जोडलेले आहोत. सांगोल्याचा विकास, शैक्षणिक प्रगती आणि संस्कृतीचा सन्मान राखत नवे व्हिजन घेऊन विश्वेश झपके पुढे आले आहेत. त्यामुळे या परिवाराचे सहकार्य ही फक्त अपेक्षा नाही, ती आमची नाती टिकवणारी शक्ती आहे.”
बैठकीत संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके यांनी नेमके आणि आग्रही मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “सांगोला शहराचा विकास हा पक्षीय मर्यादांपलीकडे जाणारा विषय आहे. राजकारण हे विकासाचे साधन असले पाहिजे, अडथळा नव्हे. एकत्र येऊन काम केले तर सांगोला शहर नव्या रूपात उभे राहील.”
उपाध्यक्ष ॲड. विजयसिंह चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “पक्षिय मतभिन्नता असली तरी विकासाच्या बाबतीत आम्ही नेहमीच एकत्र आलो. झपके घराण्याने कधीही पक्षीय राजकारणाला प्राधान्य न देता नगरसेवक म्हणून लोकाभिमुख काम केले आहे. आजही त्याच भावनेतून विश्वेश झपके उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत. सांगोला शहराच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकजूट दाखवावी.”
या बैठकीत विश्वेश झपके यांनी आपले मनोगत स्पष्ट, आत्मविश्वासपूर्ण शब्दांत मांडले. त्यांनी सांगितले, “सांगोल्याचा विकास म्हणजे फक्त रस्ते आणि इमारती नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावणे हा माझा हेतू आहे. स्वच्छ प्रशासन, पारदर्शक व्यवहार, डिजिटल सुविधा आणि तरुणांना संधी — हे सांगोल्याच्या विकासाचे चार आधारस्तंभ असतील. शहरातील पाणी, वाहतूक, कचरा व्यवस्थापन आणि नोकरीच्या संधी या विषयांवर ठोस योजना तयार आहेत. विद्यमान परंपरेला आधुनिकतेचे स्पर्श देणे हे माझे व्हिजन आहे.”
बैठकीत शिक्षक शिवाजीराव चौगुले, मारुती सलगर आणि गणेश कांबळे यांनी निवडणुकीसंबंधी नियोजन व समन्वयाबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रशांत रायचुरे यांनी प्रभावीपणे केले. बैठकीचे वातावरण उत्साही, आत्मीय आणि एकतेचा संदेश देणारे होते.
विद्यामंदिर परिवारातील सर्व सदस्यांनी या बैठकीत सहभाग नोंदवत विश्वेश झपके यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उमेदवारीतून सांगोला शहराच्या शैक्षणिक, सहकारी आणि नागरी परंपरेचा नवा अध्याय लिहिला जाईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय स्पर्धेपेक्षा विकासाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर झपके घराण्याचा वारसा आणि विश्वेश झपके यांचे नवयुगीन दृष्टिकोन या दोन शक्तींचा संगम सांगोला शहरासाठी नवी दिशा ठरू शकतो, अशी भावना नागरिकांमध्ये उमटताना दिसते.
पक्षिय धोरण,युती,आघाडी कशीही झाली तरी विश्वेश यांना निवडून आणण्या साठी शंभर टक्के योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले..
प्रा.राजेंद्र ठोंबरे,सांगोला..