
सांगोला नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्ष पदासाठी लागली चुरस
सांगोला / प्रतिनिधी
सांगोला नगरपालिकेच्या
लोकनियुक्त नगराध्यक्षांसह नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या बुधवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी सलग तिसऱ्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. इच्छुकांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव केली असली तरी अर्ज भरण्यासाठी आपापल्या नेत्यांच्या आदेशाची वाट पाहत आहेत. दरम्यान शेकाप, शिंदे सेना, भाजप, काँग्रेस, दीपकआबा गटात नगराध्यक्ष पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यावरून सर्वच पक्षांतर्गत युती, आघाडीचे घोडे अडल्याचे दिसून येत आहे. सांगोला नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार, दि. १० नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असताना गेल्या तीन दिवसांत एकही अर्ज दाखल झाला नाही.
सांगोला तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सैफन नदाफ, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करून घेण्यासाठी शासकीय पातळीवर सज्ज आहेत. परंतु गेल्या तीन दिवसांत इच्छुकांनी अर्ज दाखल करण्यासाठी पाठ फिरवली. किंबहुना गुरुवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. दुसरीकडे नगरपालिका निवडणुकीसाठी नेत्यांमधून बैठकांचे सत्र सुरूच असून, संभाव्य युती, आघाडीबाबत प्रचंड गुप्तता बाळगल्याचे दिसून येत आहे.