सांगोला पोलिसांची मोठी कामगिरी — सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने चोरी करणारा आरोपी गजाआड!

सांगोला /प्रतिनिधी
सांगोला पोलिसांनी मारहाण करून सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने चोरी करणाऱ्या आरोपीला अवघ्या काही दिवसांत गजाआड करत उत्कृष्ट तपास कौशल्याचे प्रदर्शन केले आहे.
दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ८३७/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०९(६), ३०४, ११८(१), ३५१(२)(३), ३५२, ३(५) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात फिर्यादीला मारहाण करून त्याच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावून चोरी करण्यात आली होती.
घटनेनंतर आरोपीबाबत कोणतीही ठोस माहिती नसतानाही, सांगोला पोलिसांनी गोपनीय माहिती व तांत्रिक साधनांचा अचूक वापर करून तपासाची चक्रे फिरवली. अखेर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी योगीराज संजय मोहोटकर (वय २४, रा. बुध, ता. खटाव, जि. सातारा) यास दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी अटक केली.
आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणात सांगोला पोलिसांनी केलेली ही उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी (मंगळवेढा विभाग) श्री. शिवपुजे आणि पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तपास पथकात सपोनि भारत वाघे, पोलीस हवालदार ढेरे (क.१०६३), पोलीस नाईक लेंगरे (क.८३५) तसेच सायबर सेलचे पों.ह. तांबोळी (ह.११३१) यांनी मोलाची भूमिका बजावली.
या कारवाईमुळे सांगोला पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये समाधान आणि कौतुकाची भावना व्यक्त होत आहे. अज्ञात आरोपीचा माग काढत अल्पावधीत गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल सांगोला पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सांगोला पोलिस ठाण्याची ही कारवाई गुन्हेगारीवर प्रभावी आळा घालण्याचे उदाहरण ठरली आहे.
