नगराध्यक्ष पदासाठी विश्वेश झपके नेमके कोणत्या पक्षातून* *किंवा आघाडीतून लढणार? हे अद्याप गुलदस्त्यात*

सांगोला/ प्रतिनिधी
सांगोला शहराच्या व तालुक्याच्या राजकारणात काग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरलेली आहे. यापूर्वी विधानसभेच्या अनुषंगाने नेहमीच पक्षाचा आदेश मानून त्यांनी काम केले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा आदेश मानून शेतकरी कामगार पक्षाचे कै. आ. भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांचे तर २०२४ मध्ये महाविकास आघाडीचे दीपकआबा साळुंखे-पाटील यांचे तर अनेकदा मा.आ. शहाजी बापू पाटील यांचेही प्रामाणिकपणे काम केलेले आहे.
सध्या सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी प्रा. झपके यांचे चिरंजीव उद्योगपती विश्वेश झपके यांनी तयारी दर्शवली आहे. सांगोला शहरासह तालुक्यातील प्रत्येक प्रश्नावर प्रा. झपके आणि त्यांचे कुटुंबीय आत्मीयतेने काम करत आहेत. सांगोला शहरातील नागरिक आणि समाजाच्या सर्व घटकांसाठी सातत्याने महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या झपके कुटुंबीयातील विश्वेश झपके यांनी सांगोल्यात नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याचे जाहीर केल्यामुळे सर्वसामान्य जनतेमधून मोठा प्रतिसाद मिळतो आहे. यामुळे युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मात्र विश्वेश झपके हे नेमके कोणत्या पक्षाकडून लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय इंगोले यांनी विश्वेश झपके यांच्या काँग्रेसमधील उमेदवारी बाबत दिलेल्या माहितीविषयी झपके यांच्या निकटवर्तीयांशी संवाद साधला असता सदर बातमीस कोणताही दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे सध्या तरी विश्वेश झपके हे नेमके कोणत्या पक्षाकडून किंवा कोणत्या आघाडीतून लढणार हे अद्याप तरी गुलदस्त्यातच म्हणावे लागेल.
