शाश्वत व आरोग्यदायी शेती काळाची गरज : तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव
आंबेडकर संस्थेच्या वतीने बियाणे उत्सव व पारंपारिक खाद्यपदार्थ स्पर्धा संपन्न
सांगोला/प्रतिनिधी :-
हवामान बदलामुळे शेती व मानवी आरोग्य धोक्यात आले असून शेतीतील शाश्वतता टिकवणे हे आजच्या काळातील मोठे आव्हान आहे. पारंपरिक बियाणे आणि सेंद्रिय शेतीच्या वापरातून शाश्वत शेती शक्य आहे, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव यांनी केले.डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था यांच्या वतीने आयोजित बियाणे उत्सव व पारंपारिक खाद्यपदार्थ स्पर्धा कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्ञानेश्वर ठोकळे होते. प्रमुख उपस्थितांमध्ये सरस्वती हवेली, कृषी विस्तार अधिकारी बाळासाहेब सावंत, संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत कांबळे, अंगणवाडी सुपरवायझर आदिलिंगे, भरडधान्य अभ्यासक शरदचंद्र गायकवाड, नंदू मोरे, शर्मिला केदार आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, हवामान बदलाचा परिणाम शेती व शेतीशी निगडित व्यवसायांवर होत आहे. लोकांची खाद्यसंस्कृती बदलत चालली असून त्याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. आहारातून हळूहळू नाहीशी होत असलेली भरडधान्ये, रानभाज्या व सकस अन्नपदार्थ यांचा वापर वाढविण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे काळाची गरज आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेती विकासात सकारात्मक बदल शक्य असून ‘कृषी विस्तार एआय अॅप’द्वारे शेतकर्यांनी शेतीविषयक माहिती घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे नंदू मोरे यांनी केले. त्यांनी सांगितले की संस्था गेल्या 40 वर्षापासून जमीन आणि जीवनाधार या विषयावर काम करत आहे. संस्थेने आज पर्यंत समाजातील आर्थिक दृष्ट्या वंचित असणारे तसेच अल्पभूधारक शेतकरी यांच्या आर्थिक विकासासाठी भरघोस काम केले आहे. मागील काही दशकांपासून वातावरणातील बदलांमुळे या भागातील शेती आणि शेतीशी संबंधित असणार्या व्यवसाय संकटात आले असून यावर मात करण्यासाठी संस्था जमिनीचे आरोग्य, सेंद्रिय आणि पारंपारिक शेती, शेती व्यवसाय, सामुदायिक शेती, वनशेती, बारा गुंठे शेती अशा पर्यावरण पूरक शेतीचा प्रचार आणि प्रसार करत आहे. सध्या लोकांची खाद्य संस्कृती बदलत चालली असून याचा परिणाम थेट मानवी आरोग्यावर होत असून अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे. एकीकडे रासायनिक खताच्या वापरामुळे जरी शेतीतील उत्पन्न वाढत असले तरी तितकाच खर्च लोकांच्या आरोग्यासाठी आणि शेतीच्या मशागतीसाठी खर्च होत आहे. कोरडवाहू शेतीतील शाश्वतता वाढवण्यासाठी संस्था बीज प्रक्रिया, जमिनीचे आरोग्य, पर्यावरण आणि जैवविविधता सुरक्षा यासाठी काम करत असून याचाच एक भाग म्हणून संस्थेने बियाणे उत्सव व पारंपारिक खाद्य स्पर्धा स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सरस्वती हवेली मॅडम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आहार आणि लोकांचे आरोग्य याचा खूप मोठा संबंध आहे. लोकांच्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला असून फास्ट फूडचा वापर वाढला आहे. यामुळे लोकांच्या रोगप्रतिकारक शक्ती कमी होत चाललेले आहेत. आपल्याकडे विविध प्रकारची भरड धान्य कडधान्य रानभाजी तसेच पालेभाज्या फळभाज्या उपलब्ध आहेत. मात्र याचा आहारातील समावेश खूपच कमी असल्याने लोकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. पारंपारिक खाद्यपदार्थांचा आणि सेंद्रिय खाद्यपदार्थांचा वापर लोकांनी आहारात वाढवावा यासाठी मोठ्या प्रमाणात समाजात जाणीव जागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
बाळासाहेब सावंत यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन केले. भरडधान्य अभ्यासक शरदचंद्र गायकवाड यांनी विविध प्रकारच्या भरडधान्यांची माहिती दिली. तसेच लोकांच्या आहारात याचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले.
ज्ञानेश्वर ठोकळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, संस्था समाज विकासाच्या कामासोबतच लोकांचे आरोग्य आणि जीवनमान यासाठी काम करत आहे. संस्था महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त आणि पूरग्रस्त भागात जमीन आणि जीवनाधार या विषयावर काम करत आहे. संस्थेने सुरू केलेले अनेक उपक्रम आज लोकांना उपयोगी ठरत असून यातून लोकांचा सामाजिक आणि आर्थिक विकास होण्यास मदत होत आहे. सध्याच्या वातावरणीय आव्हानांचा सामना करण्यासाठी संस्था लोकांना जागृत करण्यास प्रयत्नशील असून एक आरोग्यदायी समाज निर्माण करण्यासाठी संस्था पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अंगणवाडी सुपरवायझर आदिलिंगे मॅडम, शर्मिला केदार आदींनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमांमध्ये विविध रानभाज्या, बियाणे, खाद्यपदार्थ, पालेभाज्या आणि फळभाज्यांची बियाणे याचे प्रदर्शन मानण्यात आले होते. संस्थेने आयोजित केलेल्या खाद्यपदार्थ स्पर्धेत स्वाती गायकवाड, कडलास यांनी प्रथम, सुवर्णा काटे गौडवाडी यांनी द्वितीय, दिपाली घाडगे मांजरी यांनी तृतीय, वैशाली खंडागळे डोंगरगाव यांनी चतुर्थ तर सावा शिंदे धायटी यांनी पाचवा क्रमांक पटकावला. या कार्यक्रमासाठी सांगोला तालुक्यातून वेगवेगळ्या गावांमधून महिला, अंगणवाडी सेविका, शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारिका घाडगे, गौसपाक मुलानी, अमीर पटेल, ललिता वाघमारे, सुषमा होवाळ, स्वाती वाघमारे, चंदन आटपाडकर, गिरीधर इंगोले, शारदा गडदे, सचिन उबाळे, प्रियांका शेंडगे, सीमा गवळी यांनी विशेष परिश्रम घेतले.