*जिद्द, कष्टाची कास आणि समाजसेवेचे व्रत — दादासाहेब*
(सांगोला शहरातील समाजमित्र दादा खडतरे यांचा आज 71 वा वाढदिवस साजरा होत आहे,त्या निमित्ताने त्यांचे मित्र प्रा राजेंद्र ठोंबरे यांचा हा लेखनछंद…)
दादा बापू खडतरे
सांगोल्याच्या मातीत कष्ट आणि प्रामाणिकपणाचे बाळकडू घेऊन वाढलेले एक व्यक्तिमत्त्व म्हणजे दादा बापू खडतरे. १५ मार्च १९५५ रोजी जन्मलेल्या दादांचा जीवनप्रवास हा शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या एका ध्येयवादी माणसाची यशोगाथा आहे. आई पार्वतीबाई आणि वडील कै. बापू गोविंद खडतरे यांच्या संस्कारात त्यांची जडणघडण झाली. वडील स्वतः प्राथमिक शिक्षक असल्याने घरात शिक्षणाचे आणि शिस्तीचे वातावरण होते. चार भाऊ आणि दोन बहिणींच्या गराड्यात सर्वात धाकटे असलेल्या दादांनी लहानपणापासूनच जबाबदारीचे भान राखले.
त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सांगोल्यातील जिल्हा परिषद शाळा व सांगोला विद्यामंदिर येथे पूर्ण झाले. पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी पंढरपूर येथील केबीपी महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयात असतानाच त्यांच्यातील शिस्तप्रियता एनसीसी (NCC) च्या माध्यमातून दिसून आली. शरीरसौष्ठव आणि व्यायामाची त्यांना उपजतच आवड होती. केवळ आवडच नाही, तर वेटलिफ्टिंग सारख्या कठीण खेळात त्यांनी विद्यापीठ स्तरावर यश संपादन करून आपल्या क्रीडा कौशल्याचा ठसा उमटवला. हा व्यायामाचा छंद आजही त्यांच्या ऊर्जेचे मुख्य स्रोत आहे.
दादा खडतरे यांचा व्यावसायिक प्रवास अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी राहिला आहे. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी रोजगार हमी योजनेवरही काम केले, मात्र परिस्थितीला शरण न जाता त्यांनी सतत प्रगतीचा मार्ग शोधला. सोलापूर जिल्हा औद्योगिक सहकारी बँकेत ‘पिग्मी एजंट’ म्हणून कामाला सुरुवात करून त्यांनी आर्थिक क्षेत्रातील अनुभवाचा पाया रचला. त्यानंतर महात्मा फुले सहकारी पतसंस्थेत सलग २० वर्षे पिग्मी एजंट म्हणून काम करताना त्यांनी हजारो लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले. व्यवसायाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना, म्हणून त्यांनी स्टेशन रोड आणि नंतर जय भवानी चौक येथे चप्पल विक्रीचा व्यवसाय सुरू केला. तब्बल ३५ वर्षे त्यांनी हा व्यवसाय अत्यंत निष्ठेने चालवला. या प्रदीर्घ प्रवासात त्यांच्या पत्नी सौ. अनुराधा खडतरे यांनी ३० वर्षे खांद्याला खांदा लावून त्यांना साथ दिली, जे त्यांच्या यशाचे मोठे गमक आहे.
वयाची साठी पूर्ण झाल्यावर व्यावसायिक व्यापातून निवृत्ती घेऊन त्यांनी आपला मोर्चा आपल्या मूळ आवडीकडे म्हणजेच शेतीकडे वळवला. पिढीजात शेती असल्याने आणि मातीशी नाते असल्याने, उर्वरित आयुष्य पूर्णतः शेतीला समर्पित करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आज ते एका आधुनिक शेतकऱ्याच्या भूमिकेत आनंदाने वावरत आहेत.
केवळ स्वतःचा प्रपंच न पाहता समाजाचे देणे लागते, या भावनेतून दादांनी सामाजिक कार्यातही मोठे योगदान दिले आहे. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये संचालक म्हणून १५ वर्षे काम करताना त्यांनी संस्थेच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला. तसेच, सांगोला नगर वाचन मंदिरचे संचालक म्हणून काम करताना त्यांनी सांस्कृतिक आणि वाचन चळवळीला बळ दिले. सांगोल्यातील ‘आपुलकी प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ते आजही विविध जनहितार्थ कामात सक्रिय असतात. विशेष म्हणजे, त्यांनी ३० पेक्षा जास्त वेळा रक्तदान करून एका जागृत नागरिकाचे कर्तव्य पार पाडले आहे.
दादांचे कौटुंबिक जीवनही तितकेच समृद्ध आहे. त्यांच्या पत्नी सौ. अनुराधा यांनी नगरपालिकेत नगरसेवक आणि सभापती म्हणून काम पाहिले आहे. राजकारणात पत्नी सक्रिय असतानाही, दादांनी त्यांच्या कामात कधीही हस्तक्षेप न करता त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले, हे त्यांच्या प्रगल्भ विचारांचे दर्शन घडवते. त्यांची कन्या बी.ए. पूर्ण असून स्वतःचा पार्लर व्यवसाय व ट्रेनिंग स्कूल यशस्वीपणे चालवत आहे, तसेच तिने या क्षेत्रात डॉक्टरेटही प्राप्त केली आहे. जावई माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा एम.कॉम, बी.एड असून सध्या सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहे. नातवंडांच्या सहवासात आणि शेतीच्या कामात रमत असतानाच, समाजाप्रती असलेली बांधिलकी जपणारे दादा बापू खडतरे हे अनेकांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्त्व ठरले आहेत.
*प्रा राजेंद्र ठोंबरे सांगोला*

