तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल
सांगोला/प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील तहसील कार्यालयात शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, तहसीलदारांशी उद्धट वर्तन करणे, खोटे आरोप करून बदनामी करणे तसेच फोनवरून दमदाटी केल्याप्रकरणी एका ई-सेवा केंद्र चालकाविरोधात सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी बाळुताई शिवाजी भागवत यांनी फिर्याद दिली आहे. त्या सध्या तहसील कार्यालय सांगोला येथे कार्यरत आहेत.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, दिनांक ११ मे २०२६ रोजी तहसील कार्यालयात तालुक्यातील ई-सेवा केंद्र चालक व महा-ऑनलाईन केंद्र चालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शासकीय सेवा व नागरिकांना सेवा पुरविण्याबाबत चर्चा सुरू असताना पाचेगाव खुर्द येथील महेश मुरलीधर गुरव यांनी अचानक आक्रमक भूमिका घेत तहसीलदारांविषयी अपमानास्पद व उद्धट भाषेत बोलण्यास सुरुवात केली. त्यामुळे बैठकीतील वातावरण तणावपूर्ण झाले असून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तसेच, दिनांक २० मे रोजी रात्री मोबाईलवर फोन करून “तुम्ही मला पैशाची मागणी करत आहात”, “तुम्हीच मला नोटीस पाठवणार का” अशा स्वरूपाचे आरोप करत दमदाटी व धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीस शांततेने लेखी तक्रार देण्यास सांगितले असतानाही त्यांनी कोणतीही अधिकृत तक्रार न देता खोटे आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, संबंधित सेवा केंद्र ऑगस्ट २०२५ पासून वापरात नसल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले असून, सेवा केंद्राची युजर आयडी सुरू अथवा बंद करण्याची प्रक्रिया ही जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर होत असल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केले आहे.
याप्रकरणी महेश मुरलीधर गुरव, रा. पाचेगाव खुर्द, ता. सांगोला यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, अपमान करून चिथावणी देणे, खोटे आरोप करून बदनामी करणे तसेच दमदाटी करून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास सांगोला पोलिसांकडून सुरू आहे


