जागतिक पर्यटन दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोलाची एकदिवसीय सहल उत्साहात संपन्न
बहिर्जी नाईक समाधीस्थळ व शुक्राचार्य देवस्थान दर्शन; ऐतिहासिक, धार्मिक आणि मनोरंजनात्मक सहलीत हास्यविनोदाची रंगत
सांगोला/ प्रतिनिधी
दि. २७ सप्टेंबर : जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ सांगोला यांच्या वतीने क्लब सदस्यांसाठी सपत्नीक एकदिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून ओळखले जाणारे गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांच्या बाणूरगड (भूपाळगड), ता. खानापूर, जि. सांगली येथील समाधीस्थळाचे दर्शन तसेच शुक्राचार्य देवस्थानाचे दर्शन या सहलीत घेण्यात आले. ऐतिहासिक वारशाचे दर्शन, धार्मिक स्थळांचे भ्रमण, निसर्गाचा सहवास आणि हास्यविनोदाने नटलेली ही सहल लायन्स सदस्यांसाठी अविस्मरणीय ठरली.
सहल म्हटली की प्रवास, निसर्ग आणि देवदर्शन यांसोबतच सहप्रवाशांच्या गप्पा, मैत्री आणि आनंदाचे क्षण यांना विशेष महत्त्व असते. या सहलीत त्याचा मनमुराद अनुभव सर्व सदस्यांनी घेतला. विशेष म्हणजे, पारंपरिक वेशभूषेऐवजी आधुनिक वेशभूषेची संकल्पना राबविण्यात आल्याने सहलीला एक वेगळाच रंग आणि उत्साह प्राप्त झाला.
बाणूरगड येथील बहिर्जी नाईक यांच्या समाधीस्थळाला भेट देताना उपस्थितांना स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाची अनुभूती आली. यावेळी ला. सचिन ढोले यांनी या ऐतिहासिक स्थळाची माहिती आणि बहिर्जी नाईक यांच्या कार्याचा इतिहास अत्यंत सुंदर व प्रभावी शब्दांत विशद केला. इतिहासाच्या स्मृतींना उजाळा देत सर्वांनी समाधीस्थळाचे दर्शन घेतले.
त्यानंतर सहलीतील भोजनाचा कार्यक्रम विशेष रंगतदार ठरला. वाळलेल्या बाजरीच्या भाकरी, दही, खर्डा, गरमागरम भजी आणि गोड लाडू अशा ग्रामीण खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना मनमोकळ्या गप्पांची मैफिल रंगली. स्वादिष्ट भोजनासोबत हास्यविनोदाची मेजवानीही मिळाल्याने सहभोजनाचा आनंद द्विगुणित झाला.
शुक्राचार्य देवस्थानाच्या दर्शनाने सर्वांना आध्यात्मिक व आत्मिक समाधान लाभले. निसर्गाच्या सान्निध्यात विरंगुळ्याच्या क्षणी आयोजित करण्यात आलेल्या पती-पत्नी परिचयाच्या कार्यक्रमाने आणि ‘नाव घ्या… नाव घ्या…’ या खेळाने तर सहलीत अक्षरशः धमाल उडवून दिली. दुसऱ्याची वेळ आली की हसू आवरेना; मात्र स्वतःवर वेळ आली की उत्तर देताना घाम फुटे, अशी गमतीशीर परिस्थिती निर्माण झाली. या खेळातून पती-पत्नींमधील स्नेहबंध अधिक दृढ झाले, तर सदस्यांच्या हास्यविनोदाने संपूर्ण परिसर आनंदाने दुमदुमून गेला.
या सहलीतील प्रत्येक क्षणाने सदस्यांच्या मनात आनंदाच्या आणि मैत्रीच्या अविस्मरणीय आठवणी निर्माण केल्या. दैनंदिन धावपळीच्या जीवनातून काही काळ विरंगुळा मिळाल्याने सर्व सदस्य आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. सहलीच्या समारोपानंतर महिलावर्गातून ‘आता पुढची सहल कधी काढणार?’ अशी मागणी होऊ लागली. हीच या सहलीच्या यशाची पावती ठरली.
सदर सहल लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल MJF ला. प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या मार्गदर्शनाखाली, क्लबचे अध्यक्ष ला. प्रशांत रायचुरे, सचिव ला. प्रा. प्रसाद खडतरे आणि खजिनदार ला. प्रा. निलेश नागणे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पडली.
या सहलीच्या यशस्वितेसाठी ला. शीला झपके, ला. प्रा. डी. के. पाटील, ला. प्रा. आनंदा आलदर, ला. बाळराजे सावंत, ला. गणेश हुंडेकरी, ला. अतुल बनसोडे, ला. काकासो पांढरे, ला. अमोल कोरे, ला. अमर ढोले, ला. तानाजी कोळेकर, ला. बंडोपंत लेंडवे, ला. सचिन पाटणे, ला. वसंत गुळमिरे, ला. गुरुलिंग उजनीकर, ला. सचिन ढोले, ला. प्रा. गणेश पैलवान आणि ला. प्रा. तानाजी सरगर यांच्यासह सर्व लायन्स सदस्यांनी सहकार्य केले.
एकंदर, इतिहास, अध्यात्म, निसर्ग, मैत्री आणि हास्यविनोद यांचा सुरेख संगम साधणारी ही सहल सदस्यांच्या स्मरणात कायमची राहणारी ठरली. पुन्हा एकदा अशाच आनंददायी सहलीचे आयोजन व्हावे आणि मैत्रीच्या नात्यांतील हास्याची कारंजी अशीच फुलत राहावीत, अशी अपेक्षा सर्व सदस्यांनी व्यक्त केली.









