सांगोला/प्रतिनिधी
सांगोला शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देणारे महत्त्वपूर्ण निर्णय नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आले. नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत तब्बल ५३ विकासकामांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये स्व. आ. भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मारकासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याने शहराच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचा विश्वास नगराध्यक्ष आनंदा भाऊ माने यांनी व्यक्त केला.
सोमवारी (दि. २३) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली. तहसील कार्यालय परिसरात भाई गणपतराव देशमुख यांचे भव्य स्मारक उभारण्यास मंजुरी देत ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मा. आमदार शहाजी बापू पाटील यांनी सभेत दिलेला शब्द पाळत स्मारक उभारणीचा प्रस्ताव पहिल्याच सभेत मंजूर करण्यात आल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.
सभेत विविध समाजांसाठी समाजमंदिर उभारणीसाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत शहरात ‘नमो उद्यान’ विकसित करण्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील तालीम, जकनाई मंदिर व शिवसृष्टी प्रकल्पासाठी २ कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली.
याशिवाय थकित मालमत्ता कर वसुलीसाठी अभय योजना राबविणे, वासुद रोड परिसरात महिला व बालकल्याणासाठी योगा केंद्र उभारणे, आरक्षण क्रमांक ६३ येथील बागेस उमाजीराजे नाईक यांचे नाव देणे, अंबिका मंदिर परिसराचे सुशोभीकरण, मोकाट जनावरांसाठी गोशाळा व्यवस्था तसेच नगरपालिकेच्या विधिज्ञ पॅनलवर डॉ. सुधीर वाघ यांची नियुक्ती अशा विविध विषयांनाही सभेत मान्यता देण्यात आली.
आयोध्या नगरी येथील महिला सभागृहास शहाजी बापू पाटील यांचे नाव देणे, माळी समाजासाठी महात्मा फुले स्मृती भवन उभारणे, शहरात एलईडी पथदिवे बसविणे तसेच नगरपरिषद इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प राबविणे या कामांनाही हिरवा कंदील देण्यात आला. या उपाययोजनांमुळे ऊर्जा बचत होऊन नगरपरिषदेच्या खर्चात दीर्घकालीन बचत होणार असल्याचे सांगण्यात आले.
सभेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेस उपनगराध्यक्ष नितीन इंगवले, बांधकाम सभापती ज्ञानेश्वर माऊली तेली, शिवसेना पक्षप्रवक्ते अरुण पाटील, नगरसेवक काशिलिंग (बाबू) गावडे तसेच अन्य नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.
“सर्व पक्षीय नगरसेवकांना विश्वासात घेऊन प्रशासनाच्या सहकार्याने शहराचा कायापालट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नागरिकांनीही विकासकामांसाठी सहकार्य करावे,” असे आवाहन नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने यांनी केले.
