सांगोल्यात मटका जुगारावर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हे दाखल, रोख रक्कम जप्त
सांगोला / प्रतिनिधी :
सांगोला शहरात बेकायदेशीर मटका जुगारावर पोलिसांनी शनिवारी धडक कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत दोन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण ४ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिली कारवाई महूद परिसरातील गणपतराव देशमुख सभागृहाजवळ करण्यात आली. येथे जिशान पठाण (वय ३५, रा. महूद ता. सांगोला) हा व्यक्ती रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडून अंदाजे येणाऱ्या अंकावर पैसे घेऊन कल्याण मटका नावाचा जुगार खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून ३,३०० रुपये रोख रक्कम, मटका लिहिलेला कागद व बॉलपेन जप्त करण्यात आले.
दुसरी कारवाई सांगोला शहरातील मच्छी मार्केट शेजारील पानटपरीजवळ करण्यात आली. येथे विशाल बाबासो गावडे (वय २४, रा. आनंदनगर, सांगोला) हा व्यक्ती मुंबई मटका जुगार खेळवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी कारवाई करून त्याच्या ताब्यातून १,१७० रुपये रोख रक्कम, मटका लिहिलेला कागद व बॉलपेन असा मुद्देमाल जप्त केला.
या दोन्ही प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१९/२०२६ व २१८/२०२६ असे स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२ (अ) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पहिल्या प्रकरणात फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल अतुल खराडे असून तपास पोलीस नाईक लेंगरे करत आहेत. तर दुसऱ्या प्रकरणात फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल अमर पाटील असून पुढील तपास पोहेकॉ येडगे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून सांगोला शहरात बेकायदेशीर मटका व जुगार व्यवसायावर पोलिसांची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

