माण नदीकाठी तिरट जुगारावर पोलिसांची धाड; सहा जण ताब्यात, रोख रक्कम जप्त
सांगोला / प्रतिनिधी :
सांगोला तालुक्यातील वझरे परिसरात माण नदीकाठी सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सोलापूर ग्रामीण व सांगोला पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण ५ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला वझरे परिसरात जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस कर्मचारी रवि सुनील माने (पो.हे.कॉ.) यांच्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली. या पथकात सपोनि विजय शिंदे, पोहेकॉ शेख, पोकॉ राठोड तसेच सांगोला पोलीस ठाण्यातील पोहेकॉ बनसोडे, भानवसे व जाधव यांचा समावेश होता.
पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेऊन दि. ७ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ४.४५ वाजता वझरे गावच्या हद्दीत राजेंद्र कारंडे यांच्या शेताजवळ, माण नदीच्या पात्राजवळ झाडाखाली छापा टाकला. त्या वेळी काही व्यक्ती गोलाकार बसून पैशांची पैज लावत ‘तिरट’ नावाचा जुगार खेळत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ धाड टाकून सर्वांना जागीच पकडले.
या कारवाईत पोलिसांनी तानाजी शंकर तोरणे (रा. बलवडी), नामदेव रामचंद्र भंडगे (रा. बलवडी), सर्जेराव रामचंद्र मोहिते (रा. बलवडी), शशीराय मुकुंदा जाधव (मूळ रा. नालापूर, जि. बीड, सध्या मंगेवाडी फाटा सांगोला), नितीन भिकाजी धांडोरे (रा. वझरे) आणि सोमनाथ शिवाजी जाधव (मूळ रा. जत, सध्या वझरे) या सहा जणांना ताब्यात घेतले.
तपासणीदरम्यान आरोपींकडून रोख रक्कम व दोन पत्त्यांचे संच असा ५,१८० रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. पोलिसांच्या चौकशीत हा जुगार अड्डा सर्जेराव मोहिते चालवत असल्याचे समोर आले.
याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) अंतर्गत सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

