डीजेवर बंदी, कडक बंदोबस्ताचा इशारा; सांगोल्यात आंबेडकर जयंतीपूर्वी शांतता समिती बैठक संपन्न
सांगोला / प्रतिनिधी –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव शांततेत, सुव्यवस्थित आणि उत्साहात पार पडावा यासाठी सांगोला पोलीस ठाण्याच्या वतीने आज दि. 30 मार्च 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभागृह, सांगोला येथे शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. दुपारी 12:30 ते 2:00 या वेळेत झालेल्या या बैठकीत प्रशासन, पोलीस यंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि विविध जयंती उत्सव मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे (मंगळवेढा विभाग), तहसीलदार बाळूताई भागवत, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुधीर गवळी, नगराध्यक्ष आनंदा माने, महावितरणचे अधिकारी श्री. कोरे, पंचायत समितीचे अधिकारी, नगरसेवक प्रशांत धनवजीर, अरुण पाटील यांच्यासह सांगोला मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष आनंदा बनसोडे, बापूसाहेब ठोकळे, माजी नगरसेवक किशोर बनसोडे, दामोदर साठे, खंडू सातपुते, तानाजी बनसोडे, कीर्तीपाल बनसोडे, विनोद उबाळे, रणजीत बनसोडे, अरविंद केदार, बापू भाकरे आदींसह शांतता समिती सदस्य, पोलीस अधिकारी व पोलीस पाटील उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जयंती उत्सव मंडळांच्या पदाधिकार्यांनी मिरवणूक मार्गावरील विविध समस्या प्रशासनासमोर मांडल्या. यामध्ये रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, वीज खांबांवरील धोकादायक लोंबकळणार्या तारांची दुरुस्ती करणे, झाडांच्या अडथळा निर्माण करणार्या फांद्या छाटणे, 14 एप्रिल रोजी अवैध दारू विक्री रोखणे तसेच मिरवणुकीत महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लक्षात घेऊन पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी करण्यात आली.
या मागण्यांवर नगराध्यक्ष आनंदा माने व मुख्याधिकारी सुधीर गवळी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मिरवणूक मार्गावरील सर्व अडचणी तातडीने दूर करण्याचे आश्वासन दिले.
यानंतर पोलीस प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (सोलापूर ग्रामीण) यांनी सुरू केलेल्या से नो डीजे उपक्रमाअंतर्गत यंदाच्या मिरवणुकांमध्ये डीजे व डॉल्बीला पूर्णतः बंदी राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या.
तसेच वादग्रस्त ठिकाणी किंवा भावना दुखावतील असे पोस्टर-बॅनर लावू नयेत, जयंतीनिमित्त प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या मूर्तींची विटंबना होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहन करण्यात आले.
जयंती उत्सव साजरा करताना जातीय सलोखा अबाधित राखणे, कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची विशेष काळजी घेणे, सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर किंवा पोस्ट व्हायरल न करणे याबाबतही कठोर सूचना देण्यात आल्या. समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला.
दरम्यान, जयंती उत्सव कालावधीत तसेच मिरवणुकीदरम्यान कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सर्वांच्या समन्वयातून आणि सहकार्याने यंदाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत आणि उत्साहात साजरी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
ही बैठक शांततेत आणि सकारात्मक वातावरणात पार पडली.

